Tuesday, 2 August 2011

बुलढाण्यात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न


* छावा संघटनेचे सात कार्यकर्ते अटकेत
* कर्मचाऱ्यांचे उद्या जिल्ह्य़ात ‘कामबंद’ आंदोलन
बुलढाणा, १ ऑगस्ट/ प्रतिनिधी

चिखली तालुक्यातील शेलसूर येथील जलस्वराज्य प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, असा आरोप करीत अखिल भारतीय छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह संघटनेच्या त्याच्या सात कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात बुलढाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक राऊत यांच्या अंगावर व कार्यालयात पेट्रोल व रॉकेल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या जिल्ह्य़ात कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत रामचंद्र रिंढे (३८)(रा. शेलसूर, ता. चिखली), पदाधिकारी दत्ता मधुकर जाधव (२५)(रा. करवंड), सुनील नाना घेवंदे (२४)(रा.चंदनपूर), देवानंद गोविंद विचारे (३०)(रा. बुलढाणा), शकील अनिल पठाण (२३)(रा.शेलसूर), संतोष दत्तात्रय गंडे (२४)(रा.पळसखेड सपकाळ, विश्वास कैलास बोराडे (२४)(रा. शेलसूर) या सात जणांना अटक केली आहे. देवानंद विचारे वगळता इतर सर्व आरोपी चिखली तालुक्यातील आहेत. राऊत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज दुपारनंतर सरकारी व जि.प. अधिकारी तसेच, कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळला.
या घटनेची हकीकत अशी की, आज साडे तीन वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक राऊत यांच्या दालनात संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. त्याच वेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत रामचंद्र रिंढेंसह हे कार्यकर्ते त्यांच्या कक्षात बळजबरीने शिरले. त्यावेळी त्यांच्याजवळ पेट्रोल व रॉकेलने भरलेल्या बाटल्या, हातात लाठय़ाकाठय़ा होत्या. वीस ते चाळीस वयोगटातील या सर्व युवकांनी अतिशय संतापाच्या भरात मुख्य कार्यकारी अधिकारी ठुबे कोठे आहेत, अशी विचारणा केली. राऊत काही बोलण्याच्या आतच भारत रिंढे व त्याच्या सहकाऱ्यांनी राऊत यांच्या अंगावर व कार्यालयात रॉकेल व पेट्रोल फेकले. हे युवक काडीपेटीने राऊत यांना व कार्यालय पेटवण्याच्या बेतात असतांना तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजवळील काडीपेटी हिसकावून त्यांना कार्यालयाबाहेर हाकलले. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी या घटनेची तातडीने माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दंगा काबू पथकासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला. पोलिसांनी सर्व आरोपींना तातडीने अटक केली. पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पाटील, उपअधीक्षक भुसारे, निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
शेलसूर येथील जलस्वराज्य प्रकल्प व ग्रामीण विकासाच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात छावा संघटनेचे भारत रिंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या. मात्र, या तक्रारींची थातूरमातूर चौकशी करून प्रकरणे दडपण्यात आली. त्यामुळे चिडून जाऊन रिंढे व त्यांच्या साथीदारांनी हा अघोरी प्रकार केल्याची या परिसरात चर्चा होती. या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ माजली. सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जि.प.समोरील पटांगणात गर्दी केली. राऊत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सरकारी अधिकारी व कर्मचारी, जि.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी चार वाजतानंतर दोन तास काम बंद आंदोलन पुकारले. दोषी आरोपींविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी अधिकारी व कर्मचारी संघटनांनी केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारत रिंढे व  त्यांच्या साथीदाराच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा व दंगल घडवण्याचा प्रयत्न या व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस कोठडीत डांबले. या प्रकरणाची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन कडक कारवाईचे आदेश जिल्हा व पोलीस प्रशासनास दिले आहेत.  
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=173939%3A2011-08-01-18-31-11&catid=25%3A2009-07-09-02-01-06&Itemid=2#.TjeRYs1rlMc.facebook

No comments:

Post a Comment