Sunday, October 02, 2011 AT 01:30 AM (IST)
धर्माबाद - बाभळी बंधारा प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याचा इशारा छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांनी प्रशासनाला दिल्यामुळे बाभळी प्रकल्पापासून पाच किलोमीटरपर्यंत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी शनिवारी (ता. एक) दिले आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर बाभळी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आल्याने शनिवारपासूनच परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. "छावा'ने या आंदोलनास शेतकरी मेळाव्याचे स्वरूप देऊन बाभळीपासून पाच किलोमीटर अंतरावर सभामंडप उभारला आहे. या सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी दिली; पण प्रकल्प स्थळापर्यंत जाता येणार नाही. यासाठी दहा पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.
बाभळी प्रकल्पाजवळ मोठा बंदोबस्त उभारण्यात आला आहे. गोदावदी नदीपात्रात पाणी अधिक असल्यामुळे आंदोलक जलमार्गाने येऊ नयेत, यासाठी दोन बोटी ठेवण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेश सीमेलगतच्या गोदावरी पात्राच्या दोन्ही बाजूंनाही बंदोबस्त वाढविला आहे. बासर येथील नदी पात्रावर आंध्र प्रदेशने बंदोबस्त ठेवला आहे. कुठल्याही गनिमी काव्याने बंधारा परिसरापर्यंत स्थळावर पोचता येणार नाही, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. चार उपविभागीय पोलिस अधिकारी, 15 पोलिस निरीक्षक, 40 उपनिरीक्षक, चारशे जवान, एआरपीची एक कंपनी असा मोठा फोर्स मागविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी दिली.
अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता. दोन) सकाळी कारेगाव येथून मोटारसायकल फेरी काढण्यात येणार अशून बाभळी फाटा येथे शेतकरी मेळाव्यात रूपांतर होणार आहे. शेतकरी, कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील.
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, पदाधिकारी मोठ्या संख्येने येत असून, नाकाबंदी करण्यात येत आहे. बाभळी प्रकरणाची अंतिम सुनावणी वारंवार पुढे ढकलत असल्यामुळे हक्काचे पाणी वाहून जाते. आमची मागणी रास्त आहे, असे मत उपजिल्हाप्रमुख सतीश पाटील, तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी व्यक्त केले. या सभेचे नियोजन आता निश्चित असून, पदाधिकारी परिश्रम घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. मोकली, बाभळी, विळेगाव शिवारातही आजपासूनच बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment